वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेनी समाजातील उपेक्षित घटकांना कथा- कादंबरीचे नायक बनविले असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केले. उमरगा शाखेच्या वतीने लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त हिंगलजमाता सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि.१) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी प्रा. शिवराम अडसूळ होते. साहित्यिक मधुकर गुरव, सुधाकर झिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना प्रा. सगर म्हणाले की, या उपेक्षित नायकांच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊ यांच्या विचारांची दिशा समजून समाजकारण करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात साहित्यिक बालाजी इंगळे, कवयित्री रेखाताई सुर्यवंशी यांचा त्यांच्या भरीव साहित्यिक कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनाथ महाजन आण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहिली ही दिलीप वेदपाठक, प्रा. मोहन झिंगाडे, कौस्तुभ वेदपाठक यांच्या सहकार्याने संगीत बध्द करुन सादर केली. आणि रसिकांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्रा. शिवराम अडसूळ यांनी जयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रा. अभयकुमार हिरास, प्रा. अवंती सगर, श्रध्दा गुरव, के. पी. बिराजदार, प्रा. शरद गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मारुती खमितकर यांनी केले. सुत्रसंचालन परमेश्वर सुतार तर बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.