वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या सोशल मिडीयावर ‘ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट’ हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या मोबाईल वर हे गाणं आहे. संध्या आणि प्रनिकेत या दोन युवा गीत- संगीतकारांनी लिहिलेलं हे गाणं उमेश गवळी यांनी गायले आहे. या गीताच्या माध्यमातून आता हे कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. पडद्यामागे राहिलेल्या या युवा गीतकारांचे गीत आणि संगीत लोकांच्या चांगलेच पसंतीस पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे एक कला असते आणि ही कला मांडण्यासाठी सोशल मिडीया सारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म आजच्या पिढीला मिळाला आहे. या माध्यमातून एखादा कलाकार सर्वदूर पोहोचू शकतो, याची प्रचिती नुकतीच आली आहे.
गाणं ऐकताच पाय थिरकायला लावणारे हे गीत अाज प्रत्येकाच्या ओठावर आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस आदी सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. अवघ्या दोनच दिवसांत हे गीत त्यांनी लिहून पूर्ण केले. कोरोनाकाळात मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणारं हे गीत आहे. यूट्यूबवर हे गीत अपलोड करताचं अवघ्या चारच दिवसांत या गीताने पाच मिलियन वीव्हर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्याचा काळ सोशल मिडीयाचा आहे. अनेकजण आपले फोटो टाकून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देत ती पोस्ट सोशल मिडीयावर करत असतो. या सोशल मिडीयासाठी एखादं गाणं केलं तर हिट होईल असा विचार प्रनिकेत आणि संध्या यांनी केला आणि हे गीत लिहायला घेतले. आपल्या आवाजाचा वेगळेपण जपणारे या गीताचे मूळ गायक उमेश गवळी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील करजगावचे रहिवासी. १९७२ साली मोठा दुष्काळ पडल्यानंतर त्यांचे वडील विनायक गवळी पुण्यात बिबेवाडी येथे स्थायिक झाले. उमेश हे व्यवसायाने कीबोर्ड वादक आणि गायक देखील आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते संगीत क्षेत्रात आहेत. वादन क्षेत्रातली ही त्यांची तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील आणि आजोबा हे देखील वादकच होते. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीत क्षेत्राची आवड निर्माण झाली. परिणामी अभ्यासात मन रमले नाही. म्हणून त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला.
उमेश गवळी यांच्या गायनाची शैली, आवाजातील विविधता, माधुर्य, नाविन्य, संगीताचा अप्रतिम खजिना यामुळे त्यांच्या सुमधुर गाण्यांचा प्रभाव रसिकांवर दिसून येतो. ‘तुला काय सोनं लागलाय का?’ ‘घुंगरु पैजणांच, दुसर्यांची बायको पटवली’ एकापेक्षा एक मनाला निर्भेळ आनंद देणारी दमदार गाणी उमेश यांनीच गायली आहेत. ही सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या सर्वच सुमधूर गीतातील बोल हे मनाला भिडणारे आहे. कारण दैनंदिन आयुष्यातील घडामोडींची वास्तविकता या गाण्यांमधून दिसून येते. याशिवाय उमेश हे पुण्यात ‘लॉजिक’ नावाचा म्यूझिक स्टुडिओ देखील चालवतात. गाणं हिट होताच त्यांना राज्यातून कौतुकासाठी फोन येत आहेत.
५० गाणी लिहिल्यानंतर मिळाले सुपर यश
या गीताचे युवा गीतकार आणि संगीतकार संध्या ज्ञानेश्वर केशे ही मूळची नाशिकची तर प्रनिकेत काकासाहेब खुने हा उस्मानाबाद शहरात राहतो. दोघांनी मिळून या गीताचे बोल रचून संगीतबद्ध केले. या दोघांनी मिळून ५० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यापैकी ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ हे गीत चांगलेच गाजले. उस्मानाबाद शहरात संध्या आणि प्रनिकेत दोघे मिळून प्रस्वर आज्ञा स्टुडिओ हा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवतात. या गाण्यातून या दोघांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या दोघांवर अाणि गायक यांच्यावर सतत कौतुकाचा वर्षाव होत आहे.