वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहाऱ्यासारख्या ग्रामीण भागातील पैलवानही राष्ट्रीय स्तरावर पोहचावेत या उद्देशाने लोहारा येथील रमेश श्रावण कोकणे यांनी लोहारा येथील सद्गुरू कुस्ती संकुलातील दोन पैलवानांना दत्तक घेतले आहे.
लोहार्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणाई खेळांकडे वळावी, निरोगी व निर्व्यसनी व्हावी व लोहारा परिसरात कुस्ती खेळ वाढावा, कुस्तीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पै. रामेश्वर कार्ले यांच्या संकल्पनेतून सदगुरू कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. या कुस्ती संकुलात सद्यस्थितीत ४० ते ४५ पैलवान सराव करत आहेत. याच संकुलाच्या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रविवारी (दि.१) मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपनासाठी आमंत्रित रमेश श्रावण कोकणे यांनी दोन पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार यावेळी केला. आर्थिकदृष्टया दुर्बल पण कुस्तीची गुणवत्ता असणारे दोन पैलवान विचारले असता मुलगा मुलगी एकसमान या उक्तीप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी पैलवान दत्तक घेतले. या दोन पैलवानांना प्रत्येकी दरमहा तीन हजार रुपये खुराकासाठी देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे चालू महिन्याचे मानधन त्यांना रोख स्वरूपात दिले. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मानधन दिले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी सदगुरु कुस्ती संकुलनाचे पदाधिकारी संकल्पक पै. रामेश्वर कार्ले वस्ताद, दयानंद साळुंखे, नगरसेवक श्रीनिवास माळी, भागवत बनकर, माजी सरपंच शंकर जट्टे , महेश कुंभार, रघुवीर घोडके, उमाकांत लांडगे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुंबईचे उद्योजक गजानन म्हात्रे, महेंद्र धरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुस्ती प्रशिक्षक गोविंद घारगे यांनी आभार मानले.लोहारा शहर व परिसरातील नवख्या पैलवांनाना प्रशिक्षित करण्यासाठी पै. रामेश्वर कार्ले यांनी लोहारा येथे सदगुरू कुस्ती संकुल उभारण्याचा काही दिवसांपूर्वी संकल्प केला. त्यांच्या या संकल्पास प्रतिसाद देत अनेकांनी आर्थिक मदत करत या संकुलास पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली आहे. लोहाऱ्यासारख्या ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय पातळीवर आपले व आपल्या परिसराचे नाव उज्वल करावे असा पै. रामेश्वर कार्ले यांचा मानस आहे.