वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा यांच्या वतीने पंचायत समिती लोहारा परिसरात दिवाळीनिमित्त विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) करण्यात आले. सदरील विक्री व प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.दिवाळीनिमित्त स्वयंसहाय्यता गटांतील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन लोहारा पंचायत समिती आवारात दि. ३१ पर्यंत ठेवण्यात आले आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सोपान अकेले म्हणाले की, महिला आर्थिक सक्षम होऊन विविध व्यवसायामध्ये आपल्या कौशल्याचा वापर करून विविध प्रकारचे उत्पादन तयार करत आहेत. सदर उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. सहाय्यक गटविकास अधिकारी अमित कदम यांनी तालुक्यातील गटांनी ऑनलाईन मार्केटिंगसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तालुक्यातील नागरिकांनी सदर प्रदर्शनास भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना खरेदी करून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे आवाहन उपसभापती व्यंकट कोरे यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी केले. महाराष्ट्रामध्ये उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या विक्री व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले. सूत्रसंचलन किशोर हुडेकर यांनी तर प्रीतम बनसोडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे नागनाथ कुंभार, के. एल. राठोड, श्रीनिवास पाटील, किरण निंबाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, रामेश्वर दुरगुळे, अन्तेश्वर माळी, किशोर हुडेकर, सचिन गायकवाड, नंदन थोरात, प्रदीप लोंढे, मंगल गायकवाड, योगिता थोरात, माधुरी मुळे यांनी परिश्रम घेतले. सदर विक्री व प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध महिला गटांनी बनविलेले, मसाले, चटणी, लाडू, चकली, खवा, पणती, हस्तकलेच्या वस्तू, लोणचे आदी विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.