वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
परिस्थिती कितीही वाईट असेल तरीदेखील आपल्या मनात जिद्द आणि समोर ध्येय असेल तर यश नक्की मिळते हे लोहारा शहरातील रिया शेखने सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रियाने बारावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
लोहारा शहरातील रिया रफिक शेख या विद्यार्थिनीने बारावी परीक्षेमध्ये ८८ टक्के गुण मिळवले आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात तिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या या यशाचे शहरासह परिसरात कौतुक होत आहे. रिया शेखचे पहिली ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे झाले. इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण लोहारा हायस्कूल या ठिकाणी झाले. घरची परिस्थिती हलाकीची होती. तरीदेखील अनेक संकटांना सामोरे जात तिने हे यश मिळवले आहे. त्यासाठी सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. लोहारा शहरातील अष्टविनायक कोचिंग क्लासेस मधील अमित बोराळे, अजित विभुते आणि सदाशिव बचाटे या शिक्षकांनी रियाकडून सातवीपासून बारावीपर्यंत कोणतीही फिस घेतली नाही तसेच चिकटे मॅडम यांनीही फीस घेतली नाही. या संधीचे सोने रिया शेख हिने करून दाखविले आहे.याबद्दल रिया म्हणते, परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काही संबंध नसतो. या सर्व वाईट काळामध्ये माझ्यासोबत खंबीरपणे उभी होती ती म्हणजे माझी आई. माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात माझ्या सुख दुःखाची सोबती म्हणजे माझी आई. तिच्या कठोर परिश्रमामुळेच व कष्टामुळे आणि अष्टविनायक कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचू शकेल. शिक्षण सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे झाले. तेथील शिक्षकांनी देखील मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांची मी ऋणी आहे. माझी घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. माझी आई भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात केअरटेकर म्हणून काम करते. रिया शेखच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.