वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवाशी प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणीचा कालावधी तीन वर्षासाठी राहणार आहे.
महामंडळाची वेबसाईट तयार झाली असून लवकरच तिचे उदघाट्न होणार आहे. तसेच महामंडळाच्या जागतिक पातळीवर भिन्न देशात आणि राज्यात शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. महामंडळाद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. यापूर्वी ता. ८ व ९ नोव्हेंबर २०१९ रोजी थायलंड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक चळवळीत, मराठवाडा जनता विकास परिषद, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, उपेक्षितांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. ते नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळामध्ये ‘ साधन व्यक्ती ‘ या नात्याने बीज भाषणे दिली आहेत. तसेच आकाशवाणी औरंगाबाद, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद येथील केंद्रावरून विविध ज्वलंत प्रश्नांना अनुसरून व्याख्याने, मुलाखती दिल्या आहेत. अध्ययन, अध्यापन, संशोधानात त्यांचे मौलिक योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम. फिल. पीएच. डी. चे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल डॉ. गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.