वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे १२ दरवाजे रविवारी (दि.२६) पहाटे ६ च्या सुमारास उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्प माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दोन दिवसांपूर्वी अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे तेरणा धरणातून विसर्ग झालेले पाणी माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात येत आहे. लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे १२ दरवाजे ०.१० मीटरने रविवारी (दि.२६) पहाटे ६ च्या सुमारास उघडण्यात आले आहेत. सध्या १२९.९८ कुमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.