वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
तालुक्यातील उंडरगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १५) पासून हा जयंती सोहळा सुरू होणार आहे. यानिमित्त मंदिरास रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १५) रात्री ९ वाजता वैशालीताई सुर्यवंशी गायन कलामंच लातुर यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.१६) पहाटे हनुमान मूर्तीस दुग्ध व तेल अभिषेक होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता शोभेच्या दारूची आतिषबाजी व ९ वाजता ह.भ.प. विनोदाचार्य बळीराम कुठे महाराज (बीड) यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी (दि.१७) सकाळी श्री च्या मूर्तीची व शंभू महादेव कावडीची दिंडीसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता राजा हरिश्चंद्र नाटक तसेच सोमवारी (दि. १८) सकाळी भारुडाचा कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. तर रात्री झलक महाराष्ट्राची हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे.