लोहारा तालुक्यातील खेड गावात मंगळवारी (दि.१२) चार कावळे मृत आढळल्याने गावासह तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात बर्डफ्लूचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील खेड येथे मंगळवारी सकाळी अचानक चार कावळ्याचा मृत्यू झाला असून मयत नेमके कशामुळे झाले हे तपासणीसाठी नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान समाज मंदीरासमोर चार कावळे मृत अवस्थेत आढळले. हे नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी तात्काळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टरनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हास्तरीय पथक खेडमध्ये दाखल झाले. यावेळी पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनिल पसरटे, सहआयुक्त डॉ. साळुंके, डॉ.एस.जी.दायमी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेवराव आघाव, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ह.व.जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी करुन कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. बर्डफ्लूचा शिरकाव शेजारील जिल्ह्यात झाल्याने पशु पालकांनी सतर्क रहावे असे अवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील चार पाच जिल्ह्यात बर्डफ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती आहे. अशातच लोहारा तालुक्यातील खेड गावात ही घटना निदर्शनास आल्याने लोहारा तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील मृत कावळ्याच्या नमुन्याचे अहवाल प्रयोगशाळेतून आल्यानंतर मृत्यूचे नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होणार आहे.