वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील दोन शैक्षणिक उपक्रमांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तालुक्यातील शिक्षण प्रेमींतून कौतुक होत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२ याचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद अंतर्गत प्राप्त निकषानुसार दोन फेऱ्यामध्ये डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात लोहारा तालुक्यातील आष्टाकासार बीट मधील दोन उपक्रम पहिल्या पाच मध्ये निवडण्यात आले आहेत. अधिकारी गटात विस्तार अधिकारी आर. सी. मैंदर्गी यांचे वाचा आणि कळवा हा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आला आहे. तर शिक्षक व मुख्याध्यापक गटातील गणित विषय शिक्षक एस. के. चिनगुंडे यांचे शाळा तेथे गणित कृतीशाळा या नवोपक्रमाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे. यानिमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद संस्थेचे प्राचार्य बी.जी.चौरे, लोहारा तालुका गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा, केंद्र प्रमुख आर. एस. चव्हाण व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.