वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्राईड इंडिया स्पर्शच्या चार अद्ययावत फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील १२६ गावामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. लोहारा तालुक्यातील नागुर येथे मोफत बिपी, शुगर तपासणी, एचआयव्ही तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे प्रास्ताविक अच्युत आदटराव यांनी केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना आपल्या आजाराचे निदान उशिरा झाल्याने भविष्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. प्रकल्पाच्या माध्यमातून ३० पेक्षा अधिक वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत बिपी/शुगर तपासणी करून समस्याग्रस्त नागरिकांना समुपदेशन, सल्ला व उपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येते.यावेळी डॉ. प्रशांत जाधव नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजूनही कोव्हीड हा आजार आपल्यातून गेलेला नाही. या विषाणूने आपले स्वरूप बदलले असून त्याची प्रसार करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा जास्त आहे. ओमीक्रॉन या व्हेरियंट वर नियंत्रण मिळवायचे असेल तर गावातील १०० टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी लोकांनी मास्कचा नियमित वापर, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर आणि वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या सवयी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आचरणात आणनेही गरज बनली आहे. आभार सरपंच गजेंद्र जावळे यांनी मानले व जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर शिबिरामध्ये एकूण ४०० नागरिकांची बिपी शुगर तपासणी, २५० लोकांची एचआयव्ही तपासणी तर १७० लोकांना कोव्हीडची लस देण्यात आली. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. पल्लवी गायकवाड, सुपरवायझर किरण कदम, पल्लवी औटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ छबु माने, अंजुम इनामदार, फार्मासिस्ट सविता क्षीरसागर, स्टाफ नर्स पल्लवी सोनकांबळे, समुपदेशक प्रवीण कांबळे, बालाजी क्षीरसागर, आशा कार्यकर्ती जयश्री सोनवणे, ए व्ही रोडगे,पी बी माने, राजेंद्र थोरात, गीतांजली लोभे यांनी परिश्रम घेतले.