वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून प्राथमिक शाळेचे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अवघड वाटतो. परंतु शब्दांचा सराव असला की तो विषय सोपा वाटायला लागतो. विद्यार्थ्यांना सोप्या व मनोरंजक पद्धतीने इंग्रजी शब्द शिकता यावेत यासाठी लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शिक्षक एस. के. चिनगुंडे यांनी वर्ड शार्प नावाचे अँप स्वतः तयार केले आहे.
मार्च २०२० पासून देशात हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला. परिणामी काही दिवसांनी लॉक डाऊन जाहीर झाले. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव हळू हळू वाढतच गेला. त्यामुळे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊ लागल्या. आपल्या भागात हा ऑनलाईन शिक्षण प्रकार नवीनच होता. परंतु त्याला काही पर्याय नव्हता. या काळात ऑनलाईन शैक्षणिक धोरण खूप महत्त्वाचे ठरले. या काळात अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी अनेक प्रयत्नही केले. आपल्याकडे डिजिटल साधने असणे खुप गरजेचे आहे, जेणेकरुन प्राथमिक शाळेचा विद्यार्थी देखील पालकांच्या मदतीने सहज शिक्षण घेऊ शकेल. सध्या विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अवघड वाटतो. पण शब्दांचा सराव असला कि विद्यार्थी इंग्रजी विषय चांगला शिकतो. विद्यार्थ्यांना घर बसल्या इंग्रजी शब्दांचा सराव व्हावा व त्यांना इंग्रजी विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी लोहारा तालुक्यातील भोसगा येथील जि. प. प्रा. शाळा येथील पदवीधर शिक्षक एस.के. चिनगुंडे यांनी वर्ड शार्प नावाचे अँप्लिकेशन तयार केले आहे. या अॅप वर अनेक अक्षरे आहेत. या अक्षरातुन संबंधित शब्द शोधायचा आहे. या अॅपला वेळ देखील दिला आहे. एक- एक अक्षरे जोडुन नवीन एक शब्द या अॅप मध्ये तयार होतील. कमीत कमी वेळात अधिका अधिक शब्द जो शोधेल तो विजयी होईल या प्रकारचे हे अँप आहे. सध्या हे अॅप विद्यार्थी वापरत आहेत आणि विद्यार्थ्यांना हे अॅप आनंददायी शिक्षण देणारे आहे. कोरोना काळात असे आनंददायी शिक्षण देणारे अॅप महत्त्वाचे भुमिका पार पाडत आहेत. अशा या नाविन्यपूर्ण अॅपचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्षा रूपाली बुवा, राजेंद्र कागे, माजी उपसरपंच वैजनाथ कागे, दादा वडगावे, भैय्या एकुंडे, पिंटु हत्तरगे, मुख्याध्यापक एम. एम. डोखले, एस. एस. भोसले, डि. बी. कांबळे, एस.आर. डावरे, व्ही.बी. धालगडे उपस्थित होते. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा , विस्तार अधिकारी आर. सी. मैंदर्गी, केंद्रप्रमुख आर. एस चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.