वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय संविधान विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी वाचावे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, गटांमध्ये एकत्र काम करण्याचा अनुभव मिळावा, मूल्यांची ओळख व्हावी, तसेच मुला-मुलींमध्ये संवैधानिक मूल्ये रुजवून याद्वारेच सुजाण नागरिक तयार होतील या हेतुने तालुक्यातील माकणी येथील आय सीड फाउंडेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तालुकास्तरीय ‘भारतीय संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धा’ आयोजित केली होती.या स्पर्धेची सुरुवात दि. १२ एप्रिल पासून झाली. स्पर्धेची पहिली बाद फेरी विद्यामाता इंग्लिश स्कुल धानुरी येथे पार पडली. तर दुसरी फेरी दि. १३ एप्रिल रोजी निवासी अपंग शाळा सास्तुर येथे पार पडली. लोहारा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. लहान गटात एकूण २० तर मोठ्या गटात एकूण १२ संघांनी नोंदणी केली होती. एक संघामध्ये ३ सदस्यांचा समावेश होता. दोन्ही गटातील मिळून एकूण ३२ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. एकूण ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता अशी माहिती संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे यांनी दिली.
स्पर्धेची उपांत्य फेरी दि. १४ एप्रिल तर अंतिम फेरी व पारितोषिक समारंभ दि. १५ एप्रिल रोजी महिला केंद्र माकणी येथे पार पडला. स्पर्धेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी केले. स्पर्धेत लहान गटातून प्रथम क्रमांक अथर्व साळुंके, वेदांत सूर्यवंशी व श्रेया काजळे यांच्या संघाने, द्वितीय क्रमांक समर्थ परीट, श्रीनिवास पोतदार व जगदे गणेश यांच्या तर तृतीय क्रमांक आयुष जाधव, प्रशांत आलमले व पद्मराज साठे यांच्या संघाने पटकावला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक कीर्ती कलशेट्टी, साक्षी कलशेट्टी व दीपक जाधव यांच्या संघाने, द्वितीय क्रमांक अनुजा कुलकर्णी, रुपाली साठे व गीता चिकुंद्रे यांच्या तर तृतीय क्रमांक लक्ष्मी शिंदे, शकील सय्यद व सलोनी शिंदे यांच्या संघाने पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना संविधान उद्देशिका, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र या स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना संविधान उद्देशिकेची प्रत व वही पेन देऊन गौरविण्यात आले. मोठ्या गटाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रक्कम माकणीचे सरपंच विठ्ठल साठे यांनी तर द्वितीय व तृतीय पारितोषिक रक्कम डॉ. महादेव शिंदे यांनी दिले. लहान गटाचे तिन्ही पारितोषिक रक्कम मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कारदोरे यांच्या तर्फे देण्यात आले. स्पर्धेसाठी गया फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. बाद फेरी व उपांत्य फेरी करिता सास्तुर येथील निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, विद्यामाता इंग्लिश स्कुल धानुरीच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानातील उद्देशिका वाचन व संविधानास पुष्प वाहून करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेद्वारे या प्रकारचे व्यासपीठ आय सीड संस्थेमार्फत दिले जात आहे. याचा फायदा नक्कीच येथिल विद्यार्थ्यांना होईल. तसेच भारतीय संविधान या विषयाची ओळख विद्यार्थ्यांना अशा प्रयोगशील स्वरूपातून केली जात आहे यातून सजग नागरिक नक्कीच तयार होतील असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाथ साठे यांनी केले. यावेळी अमीन कुरेशी, पत्रकार महेबूब फकीर, आदम पठाण, गणेश मुसांडे , आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, पालक गणेश जगदे, बिभीषण वाघमारे, सुनीता कज्जेवाड, संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे, कार्यकारी संचालक महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास आय सीडचे विद्यार्थी रोहित वाघमारे, वैभव चौरे, समीर वाघमारे, संतोष शिंदे, निकिता वाघमारे, संजना शिंदे व प्रथमेश शिंदे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर कलशेट्टी यांनी तर विष्णू शिंदे यांनी आभार मानले.