वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथील साठवण तलाव प्रकल्पाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. सदर प्रकल्पाचे पूर्ण सर्वेक्षण करून उर्वरित भूसंपादन करून नव्याने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. यासाठी लागणारा निधी जलसंधारण विभागाकडून मंजूर करून घेण्याची ग्वाही आ. ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी दिली.
लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथील साठवण तलाव प्रकल्पास सन २००० साली जलसंपदा विभागाद्वारे मंजुरी देण्यात आली होती. यासाठी भूसंपादन प्रक्रिया बऱ्याच अंशी पूर्ण होऊन जवळपास ७० टक्के लोकांना भूसंपादनापोटी मावेजाही मिळाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सदर काम अद्यापपर्यंत सुरू झाले नव्हते. तसेच मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १०१ ते ६०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या पाणीसाठ्यांचे प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. यानुसार वडगाव गांजा साठवण तलाव हा प्रकल्पही जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास याठिकाणी १.६३ दलघमी पाणीसाठा होऊन सुमारे ११ चौ. कि. मी. क्षेत्रातील जवळपास ३५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही गरज ओळखून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प, उस्मानाबाद, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उस्मानाबाद, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय उमरगा, उपविभागीय अधिकारी, स्थानिक स्तर, उपविभाग उमरगा / लोहारा , उपविभागीय अभियंता, सीना-कोळेगाव प्रकल्प उपविभाग क्र. ०१ उमरगा आदी उपस्थित होते. या बैठकीत सदर प्रकल्पाचे पूर्ण सर्वेक्षण करून उर्वरित भूसंपादन करून नव्याने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला. यासाठी लागणारा निधी जलसंधारण विभागाकडून मंजूर करून घेण्याची ग्वाही आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.