लोहारा प्रतिनिधी –
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत रविवारी (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. नादरगे हे होते. यावेळी शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.एम. बालवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील महिला शिक्षिका व विद्यार्थीनींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शाळेतील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी, स्त्री मुक्ती व स्त्री शिक्षणाचे महत्त्व याविषयी भाषणे सादर केली. याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थीनी कु.दिपाली घोसले व कु. सोनाली बेळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगणारे स्वरचित गीते सादर करून उपस्थितांकडून दाद मिळवली.
तत्कालीन परिस्थितीशी तोंड देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता ती शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे, समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेतून मुक्त झाली पाहिजे यासाठीचे कार्य हे सध्याच्या युगातील महिला व मुलींसाठी खूपच प्रेरणादायक आहे. सावित्रीबाईचे जीवन चरित्र डोळ्यांसमोर ठेवून व त्यांच्या एकूण कार्यांची प्रेरणा घेवून मुलींनी शिक्षण घेतल्यास नक्कीच उज्वल यश संपादन करता येईल व समाजात सन्मानाने जीवन जगता येईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. नादरगे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे, अंजली चलवाड, शिक्षक राजकुमार गुंडुरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण वाघमोडे यांनी तर निशांत सावंत यांनी आभार मानले.
nice