वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे गुरुवारी (दि. १४) श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी रामदिंडी काढण्यात आली होती.
दिनांक १४ जानेवारी मकर संक्रांतीपासून संपूर्ण भारतभर या अभियानाची सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत हे अभियान पोहचवण्याचा संकल्प आहे. याप्रसंगी तालुक्यातील हिप्परगा रवा येथे काढण्यात आलेल्या रामदिंडी व निधी संकलन अभियानाचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे अभियान सहप्रमुख श्रीराम पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर अभियान गीत रामलल्ला का ध्यान करो मंदिर का निर्माण करो हे सामूहिक भजन गाण्यात आले. प्रास्ताविक लोहारा तालुका निधी व हिशोब प्रमुख शहाजी जाधव यांनी केले. अभियान व रामजन्मभूमी विषयी माहिती सांगताना श्रीराम पुजारी म्हणाले की, अनेक वर्षांपासून मंदिरासाठी सुरू असलेला लढा देत असताना शेकडो कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यापूर्वी यासाठी देशभरातून रथयात्रा, शिलापुजन, एकात्मता, रामज्योती यात्रा काढण्यात आली होती. आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन लढाई नंतर मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. हे मंदिर फक्त राममंदिर न राहता राष्ट्रमंदिर व्हावे यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन श्रीराम पुजारी यांनी केले. यावेळी अभियानानिमित गावात काढण्यात आलेल्या रामदिंडी मध्ये श्रीराम जयराम जय जय राम असा रामनामाचा जपाने आणि श्रीरामाच्या घोषनाने परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी लोहारा तालुका पालक दत्तात्रय दंडगुले, अभियानप्रमुख मुरलीधर होनाळकर, सहप्रमुख किशोर होनाजे, जनकल्याण समिती प्रमुख शंकर जाधव, मनोज तिगाडे, व्यंकटेश पोतदार, शिवाजी पवार यांच्यासह भजनी मंडळ, तरुण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.