वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी शिवारात शुक्रवारी ( दि. १) सायंकाळी ५.३० च्या सुमारास झालेल्या पावसात वीज कोसळून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लोहारा तालुक्यातील होळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात वीज कोसळून शेतामध्ये झाडाला बांधलेल्या दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक गाय व एक म्हैस यांचा समावेश आहे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी सदरील शेतकरी आपल्या शेतात गेले होते. इतर वेळी ते दुसर्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात. भुकंपामध्ये घरकर्त्या सासऱ्याच्या मृत्यूमुळे बालाजी उर्फ धर्मा जमादार हे आपली सासुरवाडी होळी येथेच स्थायिक झाले आहेत. मोलमजुरी करून ते आपल्या जनावरांसह आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले आहे.
तरी या संकटातून त्यांना सावरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करुन त्याना या दु:खातुन बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी होळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी सरपंच सरोजा बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, संजय मनाळे, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, दादा बिराजदार, लक्ष्मण राठोड यांनी तात्काळ तलाठी, मंडल अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी सास्तुर यांच्याशी संपर्क करुन सदरील घटनेची माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. व्ही. जगताप, सहाय्यक एन. बी. मनोहर, तलाठी एस. एल. कोणे यांनी शनिवारी (दि.२) सकाळी पंचनामा केला आहे.