वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५ डिसेंबर च्या आदेशानुसार नामाप्र करिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी गुरुवारी (दि. २३) सुधारित फेर सोडत कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. तसेच सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या ज्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, त्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. २३) लोहारा तहसील कार्यालयात प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या प्रभागासाठी सुधारित सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदीश सोंडगे, अभिजित गोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चिट्ठी काढून सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाकरिता सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्रमांक ८ व १७ हे सर्वसाधारण स्त्री करिता राहणार आहेत. तर उर्वरित प्रभाग १० व १६ हे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राहणार आहेत. यावेळी शब्बीर गवंडी, श्रीनिवास माळी, सलीम शेख, दिपक मुळे, आरिफ खानापुरे, दिपक रोडगे, विजय ढगे, बाळू कोरे, हरी लोखंडे, के. डी. पाटील, ओम कोरे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या चार जागांसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २८ डिसेंबरला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत वेबसाईटवर नामनिर्देशनपत्र भरता येतील. ४ जानेवारी ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १० जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. १८ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. १९ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
यापूर्वी नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला आहे. या दरम्यान राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात आली. या १३ जागेसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान पार पडले. परंतु उर्वरित चार जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर दि. १९ जानेवारी ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारयंत्रणा राबविली जाईल. या चार जागांसाठीही इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.