वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून या चार जागांसाठी २२ जण रिंगणात आहेत. सोमवारी ( दि.१०) दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे आज दुपारी या चार जागांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उमेदवारांकडून वेबसाईटवर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. एकूण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ४ जानेवारी ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात दाखल ४५ पैकी २३ उमेदवारी अर्ज अवैध झाले. त्यामुळे छाननी नंतर चार जागांसाठी २२उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये ३७३ मतदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे तर शिवसेनेकडून सारिका प्रमोद बंगले नशीब आजमावत आहेत. तसेच अपक्ष म्हणून राधाबाई अजित घोडके, वर्षाराणी विनोद लांडगे, संगीता गुरपद स्वामी निवडणुक लढवित आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये ४८५ मतदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेकडून अविनाश बळीराम माळी, काँग्रेसकडून विजयकुमार भानुदास ढगे तसेच अपक्ष म्हणून रियाज खडीवाले, कल्याण ढगे, विरेंद्र नरुणे, श्यामसुंदर नारायणकर, अतिउल्लाखान पठाण, दयानंद स्वामी निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये ३६२ मतदार आहेत. याठिकाणी काँग्रेसकडून आरिफ खानापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून असिफ बागवान तसेच अपक्ष उमेदवार महेबूबपाशा सुंबेकर हे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र. १७ मध्ये ५११ मतदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेकडून आरती ओम कोरे, काँग्रेसकडून निर्मला शिवलिंगय्या स्वामी तसेच अपक्ष म्हणून हानिफाबी महेबूब गवंडी, शितल संदीप माळी, छबन संबय्या स्वामी, देवश्री भरत सुतार निवडणूक लढवत आहेत.या चार जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यामुळे आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यामुळे पक्षाची उमेदवारी न मिळालेले इच्छुक अपक्षाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरले. आज सोमवारी (दि. १०) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी त्या त्या पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे या जागांच्या निवडणुकीचे चित्र आज दुपारी स्पष्ट होईल.
या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी केली आहे. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे या चार जागेच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी दि. १८ जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर दि. १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा राजकीय पक्षांकडून प्रचारयंत्रणा राबविली जाईल. त्यामुळे लोहारा शहरात पुन्हा एकदा राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे.