वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याप्रमाणे सोमवारी (दि. १५) लोहारा तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अधिसूचनेनुसार १ फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. दि. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता दिली. व दि. ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
परंतु एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ नोव्हेंबर रोजी काढला. त्यामुळे लोहारा नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्याकरिता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारी (दि.१५) प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत लोहारा तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण १७ प्रभागापैकी प्रभाग क्रमांक ११ व १२ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यात प्रभाग ११ महिलांसाठी राखीव झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ८, १०, १६, १७ आरक्षित झाले आहेत. त्यापैकी प्रभाग ८ व १७ महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ११ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ७, १५ सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक १, २, ६, ९, १३, १४ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. या सुधारित सोडतीत नामाप्रच्या पाच ऐवजी आता चार जागा झाल्या आहेत. परिणामी सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा वाढली आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शहरप्रमुख सलिम शेख, काँग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, बाळासाहेब पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, दिपक मुळे, माणिक चिकटे, माजी नगरसेवक आयुब शेख, शाम नारायणकर, बाळासाहेब कोरे, दिपक रोडगे, श्रीकांत भरारे, श्रीकांत कांबळे, विजय ढगे, दत्ता स्वामी, मल्लिकार्जन पाटील, ओम कोरे, चाँद हेड्डे, गोपाळ सुतार, ओम पाटील, सुरेश वाघ, जे.के. बायस, गोपाळ संदीकर, विजय फावडे, संभाजी सुरवसे, मधुकर भरारे, सतिश माळी, तानाजी घोडके आदी उपस्थित होते.