वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छानणी बुधवारी (दि. ८) करण्यात आली. यात दाखल ११५ पैकी २८ नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहेत.
लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर या अर्जांची छानणी बुधवारी (दि. ८) सकाळी ११ पासून सुरू करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत दिलेली कागदपत्रे, राजकीय पक्षांची ए बी फॉर्म आदींसह विविध बाबींची छानणी करण्यात आली. आपला उमेदवारी अर्ज वैध होतो का अवैध तसेच राजकीय पक्षांकडून कोणाला अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे याची सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळे उमेदवार, त्यांचे सूचक, समर्थक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी प्रभाग १ पासून अर्जांची छानणी करण्यास सुरुवात केली. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेल्या प्रभाग क्रमांक ८, १०, १६, १७ या प्रभागाची निवडणूक स्थगित झाल्याने सदरील प्रभाग वगळून उर्वरित प्रभागातील उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात आली. दाखल झालेल्या ११५ उमेदवारी अर्जंपैकी २८ उमेदवारी अर्ज विविध कारणाने अवैध झाले. ही प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी राजकुमार माने, प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार सुजाता हंगारे, कार्यालयीन अधिक्षक जगदीश सोंडगे आदींसह नगरपंचायत कर्मचारी यांनी छानणी प्रक्रियेचे काम केले. छानणी प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता पालन करावे असे आवाहन केले. १३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. २२ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार
या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढत आहे. कारण ज्या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. त्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली नाही. व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिकाणी शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिला नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच काँग्रेस (आय) स्वबळावर निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने एकही अधिकृत उमेदवारी दिली नाही. परंतु काही ठिकाणी त्यांचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत.