वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास पन्नास खाटांची मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत शुक्रवारी (दि.५) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्याची निर्मिती १९९९ साली झाली. परंतु लोहारा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पाहिजे तितका विकास झाला नाही. तसेच लोहारा हा ग्रामीण भागातील तालुका म्हणून ओळखला जातो. लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. परंतु सोइ सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांना ईतर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयाला पन्नास खाटांचे रुग्णालय होणे अत्यंत महत्वाचे असल्याने आपल्या स्तरावरून येथील नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी तात्काळ लोहारा ग्रामीण रुग्णालयाला पन्नास खाटांची मंजुरी देण्यात यावी तसेच लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये क्ष किरण तंत्रज्ञ पद रिक्त आहे. ते तात्काळ भरून नागरिकांच्या सोई-सुविधा आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आयुब शेख यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शब्बीर गवंडी, नगरसेवक गगन माळवदकर आदि उपस्थित होते.