वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि. १३) सन २०२१-२२ रानभाजी महोत्सव पार पडला. यावेळी विविध रान भाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी रानभाज्याची ओळख, आहारातील रानभाज्याचे महत्व, सोयाबिन वरील कीड रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका दरम्यान तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांनी रानभाजी महोत्सव कल्पना व रानभाजीचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी शामसुंदर पाटील, हेमंत माळवदकर, पवन रसाळ, कृषि विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी शेतातील रानभाज्या करटोली, पाथरी, आळु, केना, बांबु, कपाळफोडी, कुरडू, आघाडा, चिवळ, अंबाडी, पिंपळ, कवट, गुळलेल, आवळा, घोळ, तांदुळजा, तरवट इत्यादी भाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जट्टे यांनी तर दीपक जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास पवार, किरण निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.