वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य फेडरेशनने शासकीय आधारभूत हरभरा खरेदीसाठी अंतीम मुदत २९ मेपर्यंत दिली आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी लोहारा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतले. त्याला चांगला उतारा मिळाल्याने उत्पादन वाढले. परंतु खुल्या बाजार भावात चढ उतार होत असल्याने शेतकरी चिंतेत होते. राज्य सरकारने प्रती क्विंटल पाच हजार भाव निश्चित करीत आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्थेने तालुक्यातील मार्डी येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या खरेदी केंद्रावर जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत ७२५ शेतकऱ्यांचा सुमारे दहा हजार ६३२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. राज्य फेडरेशनने हरभरा खरेदीसाठीची अंतीम मुदत २९ मेपर्यंत दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी तालुक्यातील मार्डी येथील आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा आणून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा खरेदी विक्री संस्थेचे प्रमुख भगवान पाटील यांनी केले आहे.