वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सास्तुरचा सरपंच असताना सुमारे २७ वर्षापूर्वी स्पर्श ग्रामीण रुग्णालय व निवासी दिव्यांग शाळा सास्तुर गावात याव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. या दोन संस्थांचे आज जे वटवृक्षात रूपांतर झाले आहे ते पाहुन समाधान वाटत आहे. निवासी दिव्यांग शाळा दिव्यांगांच्या विकासासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन अत्यंत कौतुकास्पद कार्य करीत आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात स्पर्शच्या कार्यास तोड नाही. दिव्यांगानी खचून न जाता आत्मविश्वासपूर्ण जीवन जगावे. तुम्हास आज मिळालेले साहित्य हे साधन आहे, साध्य नव्हे. त्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांनी जीवनाचे निश्चित करण्यात आलेले आपले ध्येय गाठावे असे प्रतिपादन ॲड. रावसाहेब पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३०) सास्तुर येथील कार्यक्रमात केले.लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( अलिम्को) मुंबई, जिल्हा समाज कल्याण विभाग जि प . उस्मानाबाद व निवासी दिव्यांग शाळा सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय नौवहन निगम लिमिटेड पोत परिवहन मंत्रालय, मुंबई यांच्या सीएसआर निधीमधुन लोहारा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. रावसाहेब पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी स्पर्श ग्रामीण रुगणालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भारत कांबळे, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, आलिम्कोचे सल्लागार कमलेश यादव, शामललीत यादव, माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, तुळजाभवानी मतिमंद बालगृहाचे सचिव बालाजी शिंदे, लातुर येथील सुआश्रय निवासी दिव्यांग विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत कुकाले, निवासी मुकबधीर विद्यालय उमरगाचे मुख्याध्यापक भगवान वाघमारे, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना स्पर्श ग्रामीण रुगणालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी उपस्थित दिव्यांगाना जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा कानमंत्र दिला. दिव्यांगांनी आपल्यातील क्षमतांचा विकास करावा, उच्च शिक्षण घेताना समाजस्तरातील अत्यंत वंचित घटक असलेल्या दिव्यांगांनी परिश्रमपूर्वक संविधानाने दिलेले हक्क मिळवावेत व आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन समृद्ध बनवावे व समाजात सन्मानाने जीवन जगावे असे प्रतिपादन केले. विविध शासकीय योजनाचा लाभ घेवून दिव्यांगांनी स्वतःचा विकास साधावा. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने विविध योजनांचा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना तात्काळ लाभ मिळणेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. त्यासाठी दिव्यांग बांधवांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे भारत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रशालेचे अधिक्षक प्रविण वाघमोडे यांनी मानले. या कार्यक्रमात तालुक्यातील एकुण १३५ दिव्यांगांना व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, कृत्रिम हात, अंधकाठी कुबड्या, ब्रेल किट, एम आर किट, वॉकर इत्यादी साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. साहित्य प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग व्यक्तिंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्यामध्ये आत्मबळ निर्माण झाल्याचे दिसुन आले. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य भरत बालवाड, प्रा. बाबूराव ढेले, रमाकांत इरलापल्ले, राजकुमार गुंडुरे, विठ्ठल शेळगे, कपील रेड्डी, अंजली चलवाड, प्रयागताई पवळे, प्रविण वाघमोडे, एम.पी.मुस्कावाड, एन सी सूर्यवंशी, गोरक पालमपल्ले, शंकरबावा गिरी, सूर्यकांत कोरे, दगडु सगर, सविता भंडारे, किरण मैंदर्गी, सुनिता कज्जेवाड, भिमराव गिरदवाड, ज्ञानोबा माने, निशांत सावंत, संभाजी गोरे आदींनी परीश्रम घेतले.