वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित तीन दिवसीय दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ६७ दिव्यांग बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
दि. २३ सप्टेंबर पासून सुरु असलेल्या शस्त्रक्रिया शिबिराची सांगता उमेश परिचारक यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२५) झाली. मागील तीन दिवसात उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, सोलापूर, गुलबर्गा, बिदर या जिल्ह्यातून ३४५ बालकांची त्यांच्या विविध शारीरिक व्यंगासाठी मुबई येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुरेश वारके, भूलतज्ञ डॉ प्रमोद काळे, अस्थिरोग तज्ञ डॉ हिंमांशु बेंदरे, डॉ अमित काळे आदीनी रोटरी क्लब देवनार, अंबरनाथ, सरस्वती प्रतिष्ठान चेंबूर च्या माध्यमातून जॉय पाटणकर स्मृती प्रीत्यर्थ, प्रशांतराव परिचारक फौंडेशन पंढरपूरच्या सहकार्याने ६७ बालकांच्या टेडन लेन्दनिग, सीटीइव्ही अर्थोर्देसीस व इतर ६७ शस्त्रक्रिया केल्या. मागील संपूर्ण आठवडा स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व निवासी अपंग शाळा सास्तुरच्या वतीने या शिबिराची गरजू बालकांसाठी प्रसिद्धी करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची पुनर्तपासणी मुंबई येथील अस्थिरोग तज्ञ डॉ मयुरेश वारके यांच्या हस्ते दि. ९ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच दि. ६ नोहेंबर २०२२ रोजी स्पर्श ग्रामीण रुग्णालयमध्ये या बालकांचे प्लास्टर काढण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियानंतर काय काळजी घ्यावी याबद्दल डॉ मयुरेश वारके यांनी मार्गदर्शन पुनर्तपासणी ते प्लास्टर काढे पर्यंत जर पायाची पुनर्तपासणी झाली असेल तर त्या पायावर चालू नये, जास्त जोर देऊ नये, प्लास्टर झालेल्या जागेत पाणी लागू देऊ नये, अंघोळ करते वेळी प्लास्टर केलेल्या जागेवर प्लास्टर घालून अंघोळ करा, हाता पायाला धूळ लागू देऊ नये ज्या हातावर किंवा पायावर शस्त्रक्रिया झाली आहे तो हात/ पाय जमिनी पासून थोडा उंच उशी देऊन ठेवावा, प्लास्टर करून जो मोकळा भाग आहे उदा हाता पायाची बोटे इत्यादीची थोडी थोडी हालचाल, शस्त्रक्रिया झाल्यावर लगेच चालण्याचा प्रयत्न करू नये, खाण्यापिण्यासाठी कुठलेही पथ्य नाही त्यात ताजा सकस पौष्टिक आहार द्यावा असे मार्गदर्शन डॉ मयुरेश वारके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले कि, दिव्यागामुळे दैनंदिन सर्वसाधारण बाबीपासून वंचित राहावे लागत असलेल्या ६७ बालकांना आता त्यांच्या पायावर उभे राहता येईल याचा खूप मोठा आनंद व समाधान वाटत आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाची काळजी घेतल्यास लवकरच सांगितल्या प्रमाणे बाळाची काळजी घेतल्यास लवकरच हि बालके चालू फिरु पळू शकतील हि खात्री आहे. निवासी अपंग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी आभार मानले. दिव्यांग बालकासाठी देवदूत्ताप्रमाणे धाऊन आलेल्या डॉ मयुरेश वारके, डॉ प्रमोद काळे व सर्व रोटरीयन्सचे आभार मानले.
——–
“मी, महेशकुमार साळुंके रा हिमायतनगर जि. नांदेड इथून माझ्या मुलाच्या मितच्या दिव्यांग शस्त्रक्रियेसाठी आलो होतो. खाजगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियासाठी ३ लाख रुपये खर्च सांगितला होता. जो खर्च करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. पेपरमध्ये या शिबिराची बातमी वाचली. गेल्या १२ वर्षांपासून १३०० च्या वर माझ्या मुलासारख्या शस्त्रक्रिया झाल्याचे ऐकले होते. आज माझ्या मुलावर या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली. त्याबद्दल खूप आनंद वाटत आहे.