वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एका गुन्ह्यामध्ये अटक करुन कोठडीत न ठेवणे व आरोपपत्र न पाठविण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रूपये स्वीकारताना लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गोरोबा बाबासाहेब इंगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी सकाळी १०.५५ वाजता लोहारा ते जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली असून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या महितीनुसार, एका प्रकरणात तक्रारदार ३० वर्षीय तरुणााविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक न करणे, पोलीस कोठडीमध्ये न टाकणे, आरोपपत्र न पाठवणे याकरिता लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गोरोबा इंगळे याने सदरील तरुणाकडे दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी करून गुरूवारी (दि.४) लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
औरंगाबाद विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आवाहन –
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.