वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय संचालित फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर आयोजित केले होते. गावातील ३०३ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्पर्शच्या दारापर्यंत पोहोचणाऱ्या वैद्यकीय सेवांमुळे लोकांचे अंगावर आजार काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी भावना गावकर्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या वतीने तुळजापूर आणि उमरगा तालुक्यांमध्ये २४ गावांमध्ये नव्याने फिरते ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले आहेत. स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाने अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या वैद्यकीय सेवा आणि आरोग्य शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न फिरत्या वैद्यकीय पथकाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कोरेगाववाडी आणि ग्रामस्थांच्या प्रतिसादाने गावातील ३०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान बोलत असताना प्रकल्प समन्वयक तुकाराम गायकवाड यांनी मधुमेह आणि रक्तदाब यांच्या तपासणीचे महत्व नागरीकांना समजावून सांगितले आणि नजीकच्या काळामध्ये इतर २४ गावांमध्ये सुद्धा अशीच एकदिवसीय शिबिरे आयोजित करण्यात येतील असे सांगितले. डॉ. वैशाली जाधव आणि डॉ. मुजावर सर आणि स्पर्शचे वैद्याकीत पथक यांनी नागरिकांची तपासणी केली. शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी, आवश्यकतेनुसार औषध-उपचार, चष्मा, समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला नागरिकांना देण्यात आला. या शिबिरास माजी सरपंच नागनाथ कुंभार, आशा कार्यकर्ती कोंडाबाई माने, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प समन्वयक तुकाराम गायकवाड, डॉ. वैशाली जाधव, डॉ. मुजावर सर, सुपरवाईजर सुरज चव्हाण, पवन गायकवाड, मारुती धनगुले, आदिनाथ डीग्गे, प्रवीण कांबळे, प्रतीक्षा गायकवाड, प्रतीक्षा गोरे, रवी नटवे व ग्रामस्थ उपस्थित होते.