मुरूम येथील स्व. माधवराव उर्फ काका पाटील यांनी उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी, शिक्षणसंस्था, या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान-मोठ्या पाणी योजना, बेनीतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी, सहकार व औद्योगिक विकास. दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व खाजगी साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकारी तत्वावरील मुरूमच्या माळरानावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे. म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन १९९४ साली विठ्ठलसाईच्या निमित्ताने रोवली गेली. साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेचा पाया रचला. पुढे त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला. तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरणजी पाटील हे वडीलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार्यतत्पर राहून वाटचाल करीत आहेत. स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी शनिवारी (दि.२०) मुरुम शहरात साजरी करण्यात आली.
प्रारंभी स्व. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शनिवारी (दि.२०) रोजी बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे माजी चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, विठ्ठल साई कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियॉं काझी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, प्रशांत पाटील, व्यंकटराव जाधव गुरुजी, मल्लिनाथ दंडगे, राजू तोडकरी, धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, प्रमोद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.