वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागराळ येथील पूल धोकादायक झाला असून याठिकाणी नेहमी अपघात होत आहेत. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी नागराळ ग्रामपंचायतच्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आली. परंतु अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याने संतप्त होऊन नागराळच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गुरुवार (दि.२१) पासून लोहारा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील नागराळ – लोहारा रोडवरील पुलाचे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय उमरगा अंतर्गत मागील ३० ते ३५ वर्षांपुर्वी करण्यात आले आहे. त्यानंतर सदरील कार्यालयाकडून या पुलाची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कटडे गळून पडले असून पुलाचा काही भाग १३ ऑक्टोबर २०२० च्या मुसळधार पावसामध्ये ढासळला आहे. तसेच हा पूल अरुंद असून रस्ता रहदारीचा असल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. याबाबत संबंधित कार्यालयाकडे निवेदन देऊन माहिती दिली होती. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली. तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनाही या मागणीसाठी उपोषणास बसणार असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. तरीही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने नागराळच्या सरपंच रितू कुलदीप गोरे, उपसरपंच गुंडू जाधव यांच्यासह किसनराव पाटील, बळीराम गोरे, रणजित चिचोले, राजू गोरे, अभिमान गोरे, कुलदिप गोरे, वाल्मीक गोरे आदीनी लोहारा तहसील कार्यालयासमोर गुरुवार पासून बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे.