वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून मी तीन वेळा आमदार झालो. तेव्हापासून मी सातत्याने शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले. आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवून विधान परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (दि.२४) आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक संवाद अभियानाअंतर्गत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, बामुक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश कदम, डॉ. विश्वास माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमंत भुरे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, दत्ता चटगे, सलीम जमादार, गोविंद पाटील, पी. जी. मदने, गणेश माने, अभिजित जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना आ. काळे म्हणाले की, आमदार आपल्या दारी ही संकल्पना प्रत्येक वाड्या वस्तीवर पोचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळात विद्यार्थी पटसंख्या अभावी शाळा बंद होणार नाहीत याचीही काळजी घेऊन अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविला. जुनी पेन्शन योजना, कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या वारसांना अनुदान, शिक्षकांच्या बढतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व्यवस्था, वरिष्ठ महाविद्यालयातील नेट-सेटचा प्रश्न, आरसीओसीचा प्रश्न, प्राचार्यांच्या वयोमर्यादेचा व सेवानिवृत्तीच्या संदर्भातला प्रश्न आदी प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मी केल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव काळे ते विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याचा मी अनेक वेळा जवळून अनुभव घेतला आहे. खऱ्या अर्थाने शिक्षकांचे नेतृत्व करणारे आमदार सक्षम असून शिक्षकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम वरिष्ठ सभागृहात विविध प्रश्न मांडून ते पूर्णत्वास नेण्याचे काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मानले. यावेळी या परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.