लोहारा (lohara) तालुक्यातील सास्तुर (sastur) येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयांमध्ये (sparsh rural hospital) एच.आय.व्ही./एड्स सह जगणाऱ्या व्यक्तीसाठी मंगळवारी (दि.२८) गौरव सोहळा साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य (maharashtra state) एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा रुग्णालय धाराशिव, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग धाराशिव व एचआयव्ही/एड्ससह जगणाऱ्या लोकांद्वारे महाराष्ट्राचे नेटवर्क द प्राईड इंडीया काळजी व आधार केंद्र केद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २८) स्पर्श ग्रामीण रुग्णालयात “एआरटी अविरत सेवेची यशस्वी २० वर्ष सातत्यपूर्ण सेवेचा गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला होता. मागील २० वर्षापासून मोफत एआरटी औषधोपचार सातत्याने घेणाऱ्या रुग्णाचा सत्कार करण्याकरिता आजचा उपक्रम राबवण्यात आला. सध्या महाराष्ट्रात एकूण २,४०,१६५ एच आय व्ही संसर्गित रुग्ण एआरटी औषधोपचार घेत आहेत. महाराष्ट्रात एकूण ८३ एआरटी केंद्र कार्यरत असून १७७ उपएआरटी केंद्र सुरु आहेत. आज एआरटी केंद्राव्दारे मोफत एआरटी औषधाचा लाभ घेतल्यामुळे संपूर्ण देशामध्ये लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी देखील योगदान दिले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण ७७ टक्के पेक्षा कमी झाले आहे.
या वर्षात एआरटी उपचाराचे २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय धाराशिव, जिल्हा आरोग्य अधिकारी व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा रुग्णालय धाराशिव, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग धाराशिव व एचआयव्ही/एड्ससह जगणाऱ्या लोकांद्वारे महाराष्ट्राचे नेटवर्क द प्राईड इंडीया काळजी व आधार केंद्र केद्र धाराशिव यांच्या वतीने स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्य स्पर्श ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम, एआरटी विभाग धाराशिवचे एसएमओ डॉ. प्रणिता पौळ, डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की, एआरटीचा औषधोपचार सातत्यपूर्ण घेणे का आवश्यक आहे. २० वर्षापासून एचआयव्ही संसर्गित रुग्ण एआरटी औषधोपचार घेऊन जीवन चांगल्या प्रकारे कसे जगत आहेत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये आयसीटीसी विभाग व एआरटी केंद्रामार्फत एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीसाठी आयसीटीसी समुपदेशक व एआरटी समुपदेशक तसेच आयसीटीसी विभागामध्ये व एआरटी विभागामध्ये डॉक्टर अहोरात्र रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना जीवन जगण्यासाठी मदत करीत आहेत. एचआयव्ही संसर्गित रुग्ण एआरटी औषधोपचार घेऊन आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो तसेच व्यक्तीने स्वत:च्या इच्छा शक्तीने आपल्या आयुष्यात वेगळे आणि चांगले वळण देऊ शकतो.
त्यानंतर जिल्हा रुग्णालय एआरटी विभाग धाराशिवच्या एसएमओ डॉ. प्रणिता पौळ यांनी रुग्णांना माहिती देताना असे सांगितले कि, एचआयव्ही संसर्गित रुग्णाने उपचार घेताना रुग्णाने स्वताचे दैनंदिन काम स्वतचा आहार चांगल्या प्रकारे घ्यावा. एआरटी गोळ्यामध्ये नियमितता असावी तसेच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी चांगले प्रयत्न करावे असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांनी कलंक आणि भेदभाव याबाबत एचआयव्ही संसर्गित रुग्णाबाबत ही भावना ठेऊ नये असे सांगितले. तसेच चांगल्या व्यक्तीच्या सहवासाने माणसाच्या आयुष्याचे सोने होते हे उदाहरण देऊन सांगितले. तसेच आयसीटीसी व एआरटी विभागामार्फत एचआयव्ही संसर्गित रुग्णाला योजनाची माहिती वेळोवेळी समुपदेशन दिले जाते. तसेच या रुग्णांनी सकारात्मक जीवन जगावे असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर एचआयव्ही संसर्गित रुग्णाचे मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच एचआयव्ही संसर्गित रुग्णांनी एआरटी औषधोपचार वेळच्या वेळी सातत्याने घेतलेल्या रुग्णाचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत अदटराव यांनी केले. शुभांगी माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालय एआरटी विभागाचे धैर्यशील नारायणकर, ज्योती कांबळे, भिकुलाल जाधव, डॉ. प्रणिता पौळ, डॉ. जाधव, संभाजी खांडबे, तानाजी बचाटे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे एआरटी विभागाचे युवराज मोरे, सुधीर कावळे, विक्रम कुंभार, आयसीटीसी विभागाच्या दीपा पवार, प्रवीण कांबळे, आझम शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.