लोहारा येथील बसवेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य ‘सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, श्री परमरहस्य पारायण व शिवमहापुराण कथा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
पूज्य ष.ब्र. १०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत लोहारा शहरातून अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि शिवनामाच्या जयघोषाने संपूर्ण लोहारा शहर दुमदुमून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक पर्वणीची मंगळवारी (दि.२५) सांगता झाली. या सांगता सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सप्ताहात आणि विशेषत: सांगतेच्या दिवशी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. महिला, पुरुष आणि आबालवृद्ध शिवभक्तांच्या उपस्थितीने लोहारा शहरात एक अनोखा शिवभक्तीचा जागर घडवून आणला. या सोहळ्याची सांगता शि.भ.प. सुरमणी कुमारसागर महाराज लोहारेकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यांनी आपल्या वाणीतून अध्यात्माच्या माध्यमातून सुदृढ समाज, प्रगत विश्व आणि बलशाली देशाच्या निर्मितीचा संदेश दिला. अध्यात्म केवळ वैयक्तिक कल्याणासाठी नसून ते समाजकल्याण आणि राष्ट्रभक्तीचे प्रभावी माध्यम आहे, असा जागर त्यांनी भक्तांच्या मनात घडवला.

या सप्ताहामध्ये अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि हरिहर भजनी मंडळ यांनी शिवनामाचा गजर केला. या सोहळ्यात सर्व शिवभक्त यांनी हिरेरीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. सोहळ्याच्या सांगतेनंतर दत्तात्रेय बाबुराव बिराजदार व दिपक कोंडाप्पा मुळे यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या मंगलप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संतांचे आशीर्वाद घेतले. यामध्ये युवा नेते शरण पाटील, माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्तात्रय बिराजदार, दत्तात्रय फावडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, हरी लोखंडे, डॉ. अमलेश्वर गारठे, जालिंदर कोकणे, प्रशांत काळे, मल्लिनाथ फावडे, दिपक मुळे, विकास होंडराव, प्रमोद बंगले, किशोर पाटील, ओम पाटील, संतोष फावडे, विरभद्र फावडे, गणेश तोडकरी, गणेश कमलापुरे, योगेश मिटकरी आदीसह समाज बांधव उपस्थित होते.








