सन २०२६-२७ सालात होणाऱ्या विविध स्तरावरील लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण १० क्रीडाप्रकार घेतले जाणार आहेत.
यापैकी बुद्धिबळ, योगासन, बॅडमिंटन या स्पर्धेच्या उद्घाटनाने शनिवारी (दि.१२) या स्पर्धेची सुरुवात झाली. हायस्कुल लोहारा शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ सुतार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी व तसेच त्यांना विभाग, राज्य स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत ५ टक्के खेळाडूना राखीव कोटा ठेवण्यात येतो तर दहावी व बारावी परीक्षांत विद्यार्थ्यांना जिल्हा स्पर्धेत जिंकल्यास ५ गुण, विभाग जिंकल्यास ७ गुण, तर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्यास १२ गुण दिले जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. सप्तरंग मंगल कार्यालय लोहारा येथे बुद्धिबळ, योगासन, बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. जवळपास १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन लोहारा हायस्कूलचे मुख्याध्यापक व क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोर पवार, बी.एस.पाटील, व्यंकट क्षीरसागर,शिंदे सर, वैजीनाथ पाटील,घोडके आदी शिक्षक उपस्थित होते. तर पंच म्हणून रोहन जगताप, मक्तेदार सर, विश्वजित ओवंडकर यांनी काम पाहिले.








