वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारनं १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघात खासदार ओमराजे निंबाळकर यानी केला आहे. मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे यांनी यावेळी सांगितले आहे.
सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी दहा ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत. एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला असुन अगोदरच उत्पन्नात घट झाली आहे. एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा होत आहे. सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावुन घेतल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते. जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.