लोहारा शहरातील चार शाळांमध्ये सोमवारी (दि.२६) सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना बालकांच्या लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ बाबत जनजागृती करण्यात आली.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दि. २६ ते ३१ ऑक्टोबर याकालावधीत देशभरामध्ये सुरक्षित बचपन अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या सर्व शाळांमध्ये लोहारा तालुका विधी समिती, गटशिक्षण कार्यालय लोहारा आणि पोलीस प्रशासन लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा न्यायालयाचे न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शाळांमध्ये सुरक्षित बचपन अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना बालकांच्या लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ बालमजुरी सायबर गुन्हेगारी व इतर मार्गाने होणारे शोषण थांबवण्यासाठी कायद्याची माहिती सांगणे, कायद्यांमध्ये असलेल्या संरक्षणाच्या तरतुदी सांगणे, आणि चाईल्ड लाईन गुड टच बॅट टच अशा बाबींची जनजागृती करण्यासाठी लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, हायस्कुल लोहारा व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या चार शाळांमध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात कार्यक्रम पार पडला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, सरकारी विधिज्ञ संतोष काळे, ॲड. तुकाराम मोरे, ॲड.महेश जट्टे, विस्तार अधिकारी विश्वजीत चंदनशिवे, तज्ञ मार्गदर्शक सुरेखा नारायणकर, प्राचार्य रामदास ढोकळे, प्रभारी मुख्याध्यापक गोपाळ सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




