शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी खरीप २०२० पीकविमा प्रकरणी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि त्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढलेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे. या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी रुपयांची पीकविमा रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५७ हजार २८२ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास ९ हजार रुपये या प्रमाणात पीकविमा रक्कम येत्या आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. या न्यायालयीन लढ्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मा.सर्वोच्च न्यायालय, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.अतुल डख तसेच या लढ्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून मोलाची मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचे आभार मानले.
दुष्काळ आणि नापिकीच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मिळणारी ही आर्थिक मदत निश्चितच मोठा आधार ठरणार आहे. त्यामुळे आता ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे






