लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२३) ग्रामस्तरीय नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी गाव सभेत जनजागृती व उपाय योजना करण्याच्या संदर्भात लोकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने लोकांशी संवाद साधला जात आहे. एकोंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने पुढाकार घेत अशाच गाव बैठकीचे आयोजन केले आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, जनावरांचे पिण्याचे पाणी व चारा आदी बाबींचा विचार आणि भविष्यातील नियोजन करण्यासंदर्भात यात चर्चा होणार आहे.

तसेच या गाव बैठकीमध्ये गाव समिती स्थापन करून याच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ग्रामस्थांची भूमिका, येणाऱ्या काळात दुष्काळाला तोंड देण्यासाठीची पूर्व तयारी, जलतारा, परसबाग, विहीर पुनर्भरण, ओढे नाले खोलीकरण रुंदीकरण, विहीर खोलीकरण, बोअरवेल पुनर्भरण आदी विषयांवर मार्गदर्शन हे गावकऱ्यांना दिले जाणार आहे. यासाठी ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी येथील कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावात लोकसहभागची चळवळ उभी राहील असा विश्वास ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.






