लोहारा (Lohara) तालुक्यातील हिप्परगा (रवा) व परिसरात अत्यल्प पर्जन्यमान झाले असलेमुळे खरीप (kharip) पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली.
याबाबत सोमवारी (दि. ७) लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हिप्परगा (रवा) व शिवकरवाडी येथे मागील एक महिन्यापासून पाऊस झाला नाही. त्यामुळे गावातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गावामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अद्याप पिकपाहणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेसाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा. गावात अंदाजे १ हजार पेक्षा जास्त पशुधन असून त्यांना चारा मिळणेसाठी चारा छावणी मंजूर करून तात्काळ चालू करावी.

जनावरांना चारा नाही. तसेच रब्बी पेरणीसाठी अनुदान व खते/बियाणे पुरवठा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच अभिमान कांबळे, माजी सरपंच विजय लोमटे, अरुण राठोड, करन पाटील, सुशांत मोरे, सुनील पवार, सुरज शिवकर, मारुती साळुंके, महेश नरगाळे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. अशोक शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले.








