वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या आयोजनातून व टाटा कम्युनिकेशन यांच्या अर्थसहाय्यातून लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते, मंडळ कृषी अधिकारी श्री. माळकुंजे साहेब, तसेच सेंद्रिय शेती विषयाचे कृषीतज्ज्ञ श्री. जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे तालुका समन्वयक समीर सय्यद यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना संस्थेची ओळख उपस्थिताना करून दिली. तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व कार्यप्रणाली बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री. जाधव यांनी सेंद्रिय शेतीची गरज व फायदे स्पष्ट करताना बीजप्रक्रिया, वेस्ट डीकंपोझर, एस-९ कल्चर, घनजीवामृत, जीवामृत, सापळा पिके, निंबोळी अर्क, अग्निअस्त्र यांचा एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनातील उपयोग व फायदे सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर श्री. माळकुंजे यांनी फळबाग लागवडीचे महत्त्व, पाणी बचतीसाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धती, तसेच गांडूळ खताचे फायदे याविषयी माहिती दिली. यानंतर भीमराव कुलकर्णी यांनी शेतीपूरक व्यवसायांची माहिती देत, त्यातून शेतकऱ्यांना उपजीविकेच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात यावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या शेवटी तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते यांनी सेंद्रिय शेतीतील बीजप्रक्रियेचे महत्त्व, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांच्या माध्यमातून शेती विकास, त्यातून मिळणारे विविध व्यवसाय तसेच एआय अॅप वापराबाबत माहिती दिली व कृषी विभागांच्या विविध योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी विठ्ठल ढवळे यांनी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या अंमलबजावनीतून व टाटा कम्युनिकेशन यांच्या अर्थसहाय्याने सुरु असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या विकासाद्वारे ग्रामीण समुदायाचे सक्षमीकरण या प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, महिला सक्षमीकरणासाठी उपजीविकेच्या संधी, पाणलोट विकासाची कामे तसेच पाणी बचतीसाठी ठिबक व तुषार तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फार्मप्रिसाईज अॅपच्या वापराबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल ढवळे यांनी तर खंडू पांढरे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस जवळपास १२० महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.







