लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५- ३० साठीचे आरक्षण सोडत काढण्यात आली. लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी (दि.१०) ही सोडत काढण्यात आली.
तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या सन २०२५ -३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांना प्राधिकृत करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, नायब तहसीलदार रतन काजळे, नाना मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी आरक्षण सोडतीस सुरुवात झाली. सुरुवातीला तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर अनुसूचित जाती, नामाप्र व सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी लहान मुलांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी निवडणूक विभागाचे वजीर अत्तार, महेश कुलकर्णी, अभिजित गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, नामदेव लोभे, सयाजी शिंदे, परवेज तांबोळी, परमेश्वर साळुंके यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण खालीलप्रमाणे –
अनुसूचित जाती –
जेवळी (दक्षिण), फनेपुर, वडगाववाडी, हराळी
अनुसूचित जाती (महिला) –
विलासपूर पांढरी, चिंचोली (रेबे), जेवळी (उत्तर)
नामाप्र –
नागुर, कास्ती (बु), हिप्परगा (स), वडगाव (गां), हिप्परगा (रवा), कानेगाव
नामाप्र (महिला) –
माळेगाव, बेलवाडी, लोहारा (खुर्द), धानुरी, तोरंबा, आष्टाकासार
सर्वसाधारण –
खेड, राजेगाव, अचलेर, दस्तापुर, उदतपूर, सास्तुर, चिंचोली (काटे), सालेगाव, आरणी, एकोंडी, करवंजी, माकणी
सर्वसाधारण (महिला)
उंडरगाव, कोंडजीगड, मोघा (बु,) नागराळ, बेंडकाळ, भातागळी, कास्ती (खु), मार्डी, भोसगा, तावशीगड, मूर्षदपूर, होळी, करजगाव.
लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी व दक्षिण जेवळी या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकीत मोठी चुरस पाहायला मिळते. या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंच पदासाठी अनेकजण निवडणूक लढवतात. परंतु या दोन्ही ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे याठिकाणी सरपंच पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. माकणी ग्रामपंचायतचे सरपंच पदही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. याठिकाणीही सरपंच पदासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.