लोहारा (Lohara) तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि.२३) त्यांच्या नातेवाईकांना पत्र पाठवून मतदान (vote) करण्याविषयी आवाहन केले.
मतदान जनजागृती करण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही निवडणुकीत १०० टक्के मतदान होत नाही. लोकांमध्ये मतदानविषयी जागृती व्हावी व लोकशाही मजबूत व्हावी यासाठी बुधवारी (दि.२३) तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परगावी राहणारे जवळचे नातेवाईक, मामा, मामी, मावशी, आत्या, आजी, आजोबा व जवळच्या नातेवाईकांनी १०० टक्के मतदान करावे म्हणून पोस्टकार्ड पाठवून आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक पोस्टकार्ड पाठविले. याचा शुभारंभ गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या जवळच्या नातेवाईक यांना एकूण ११५ पत्रे एकाच वेळी पाठविण्यात आली. यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी केंद्रप्रमुख बालाजी पवार, मुख्याध्यापक एन.बी. घोडके, विलास नेलवाडे, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे, शिवाजी साठे, गौरीशंकर कलशेट्टी, अच्युत आलमले, सुभाष इंगळे, गणेश गोरे, पपू कांबळे, सावित्रा आकुलवार, ज्योती बिसले, जयश्री गीर, नयन शेख, ज्ञानोबा कासले, अश्वीनी अंगुले, प्रियांका मल्लाडे, पाटील मॅडम आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.