लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच माजी सैनिकांचे औक्षण करून विद्यार्थिनींनी राखी बांधली. या अभियानांतर्गत निबंध व रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील, प्राचार्या उर्मिला पाटील यांच्यासह माजी सैनिक महादेव सलगर, राजू सूर्यवंशी, शिवाजी मुलगे, मारुती बंडगर, प्रकाश मुळे, आनंद सूर्यवंशी, दत्तू भोकरे, प्रभाकर भोंडवे हे मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिकांनी देश सेवेसाठी जे बलिदान दिले आहे व ते सेवा करत असताना आपल्या देशातील बंधू-बहिणींचे रक्षण केले आहे. त्यानिमित्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या वतीने रक्षाबंधनाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळा, कॉलेजच्या मुलींनी माजी सैनिकाचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी माजी सैनिक राजू सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. सचिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व रक्षाबंधनाची गरज याविषयी माहिती दिली.


यावेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परिक्षक म्हणून धनराज धनवडे, नारायण आनंदगावकर, बालाजी सूर्यवंशी, प्रशांत काळे, नागनाथ पांढरे उपस्थित होते. या स्पर्धेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.