वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच शुक्रवारी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले.
लोहारा शहरासह परिसरात गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. लोहारा शहरातील नवीन तहसील कार्यालय व न्यायालयाच्या पाठीमागे वॉर्ड क्र.१० मध्ये असलेल्या न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यातूनच आपली शाळा गाठावी लागली. या शाळेत नर्सरी ते इयत्ता ८ वी पर्यंतचे जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत येण्यासाठी या चिमुकल्यांना जवळपास ४०० मीटर अंतर चिखल व पाण्यातून येत खूप कसरत करावी लागते. पावसाळ्यात दरवर्षी विद्यार्थ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हा सिमेंट रस्ता रस्ता बनवून रस्त्याचा कायमचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.