वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले असल्याने याविरोधात उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेले फलक व घोषणा देत गुरूवारी (दि. २१) हुतात्मा स्मारकापासुन तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर इंधन दरवाढीचा निषेध करीत दुचाकी फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच २०१४ सालीची जुनी नरेंद्र मोदी यांनी केलेली फसवी भाषणे वाजवुन उपरोधात्मक घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून वेळोवेळी इंधन दरवाढ करत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या फसव्या योजनांची माहिती जगजाहीर करून इंधन दरवाढ कमी न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी वाहनासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.