वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ,जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह सर्व तहसीलदार यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सोमवारी (दि. १२) आदेश दिले आहेत.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणले आहे की, दि. ९ जुलै रोजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा, इटकळ, जळकोट, मंगरुळ, परंडा तालुक्यातील आस, जवळा, आनाळा, सोनारी, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळिंब, गुळज, तसेच लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मी स्वतः दि.१० जुलै रोजी मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कनगरा, बोरगाव (राजे), घुगी, पाडोळी, कामेगाव तसेच समुद्रवाणी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे ओढा नाल्यांना पूर आला होता. या पुरामध्ये लासोना येथील बबन भगवान रसाळ (वय ४२) व कनगरा येथील समीर गुनुस शेख (वय २७) हे दोघेजण वाहून गेले होते. त्यापैकी समीर मुनुस शेख यांचा मृतदेह सापडला आहे. परंतु राहीलेल्या एकाचा शोध सुरु असून अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे शोध मोहीमेचे कार्य युध्द पातळीवर सुरु करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी गावात शिरल्याने घरांची पडझड झाली व नुकतीच पेरणी केलेली पिके, जमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या आहेत तसेच रस्त्यावरील जुने पुल व बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, पिक नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे तसेच जिवीत हानीचे पंचनामे तात्काळ करणे, वाहून गेलेले पुल व बंधारे याची देखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच मयत समीर युनुस शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच उपरोक्त गावातील तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या पत्राची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह सर्व तहसीलदार यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सोमवारी (दि. १२) आदेश दिले आहेत.