वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन महाविद्यालये सुरू करावीत या मागणीसाठी लोहारा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे. गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देशातील महाविद्यालय संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे बंद आहेत. संपूर्ण देशातील जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसीचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी केंद्र शासनाकडून होणारा लसीचा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी विद्यार्थी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी लसीकरण झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, उपाध्यक्ष सुमित कदम, शहराध्यक्ष इब्राहिम पटेल उपस्थित होते.