वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील शेतकरी यावर्षी वेगळ्याच प्रकारच्या नवीन संकटाला तोंड देत आहेत. गोगलगायांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी बुधवारी (दि.२०) तालुक्यातील सास्तुर व होळी शिवारातील गोगलगायीने प्रादुर्भाव केलेल्या क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी बिडबाग म्हणाले की, गोगलगाय ही यापूर्वी उपद्रवी कीड म्हणून गणली जात नव्हती. परंतु यावर्षी काही ठिकाणी गोगलगाईंचा प्रादुर्भाव हा सोयाबीन पिकावर दिसून येत आहे. तरी या संदर्भात गावातील तसेच शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने विविध पद्धतींचा वापर करून गोगलगायींवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः पुरता विचार न करता सामूहिक पद्धतीने यावर नियंत्रण मिळवावे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी यांनी गोगलगायीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले की, शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे. जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल ) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
जर पपईची पाने आणि झेंडूची रोपे हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा. अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या व एकात्मिक पद्धत वापरून वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होईल असे प्रतिपादन बिडबाग यांनी केले.
यावेळी कृषी सहाय्यक दीपक जाधव यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर, कृषी पर्यवेक्षक गयाप्रसाद सागर, प्रदीप भोसले, कृषी सहाय्यक दीपक जाधव, बाळासाहेब बिराजदार, पी. पी. पवार यांच्यासह शेतकरी प्रकाश औसेकर, विरेंद्र पवार, विकास पांचाळ, गोविंद सुतार, उपसरपंच राजवर्धन पाटील, दौलत पुरणे, रोहित पुरणे, सचिन मिटकरी, हरी माळी, शिवराज सडडू , श्रीधर माने, विजयकुमार मिटकरी व गावातील ईतर शेतकरी उपस्थित होते.