वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य महाआवास योजनेत लोहारा पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम आली असून त्याबाबत पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते रविवारी (दि.१५) उस्मानाबाद येथे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या राज्यातील महाआवास आभीयानात पंचायत समिती लोहारा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रथम आली असून राज्यात हे अभियान २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात आले होते.स्वातंत्र्यदिनी रविवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पंचायत समिती लोहाराच्या सभापती हेमलता रणखांब, गटविकास अधिकारी सोपान अकेले व सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, मेघराज पवार आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा पंचायत समिती प्रथम आल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.