वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत या मागणीसाठी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शुक्रवारी ( दि. १२) राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम लक्षात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्य सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एस. टी. कामगार व कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपास लोहारा तालुका भाजपाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात येत आहे. त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अशीही मागणी या निवेदनात केली आहे. तहसीलदार संतोष रुईकर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब शेख, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हतरगे, मिलिंद सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, ओबीसी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, भोजप्पा कारभारी, व्यापारी सरचिटणीस बाळु माशाळकर, नागनाथ लोहार, युवराज जाधव, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.